Mumbai BMC Election News Marathi: मुंबई महानगरपालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढवणार, रमेश चेन्निथला यांची घोषणा. भाजप, शिवसेनेवर टीका; सुप्रीम कोर्टामुळेच निवडणूक होत असल्याचा आरोप.
Mumbai BMC Election News Marathi
Mumbai Mahapalika Election | मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा बिगूल अखेर वाजला आहे. गेल्या चार वर्षांपासून रखडलेल्या या निवडणुकीसाठी आता सर्वच राजकीय पक्ष कंबर कसून मैदानात उतरले आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांच्या जुळवा-जुळवीला वेग आला असताना, काँग्रेसने आज मोठी घोषणा करत राजकीय वातावरण तापवले आहे.
मुंबई महानगरपालिकेची निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढवणार, अशी स्पष्ट घोषणा महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनी केली. ते मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी बोलताना चेन्निथला यांनी सरकारवर जोरदार टीका केली. “मुंबई महानगरपालिकेची निवडणूक गेल्या चार वर्षांपासून झाली नाही. सुप्रीम कोर्टाच्या हस्तक्षेपामुळेच ही निवडणूक होत आहे. सरकारच थेट महापालिका चालवत होते. प्रत्येक निर्णयात सरकारचा हस्तक्षेप होता. या लोकांना निवडणूक घ्यायचीच नव्हती, निवडणूक प्रणाली स्वीकारायची इच्छाच नव्हती,” असा आरोप त्यांनी केला.
चेन्निथला पुढे म्हणाले, “वर्षा गायकवाड आणि आमच्या सर्व वरिष्ठ नेत्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही प्रदूषण, रुग्णालयांतील परिस्थिती आणि भ्रष्टाचाराविरोधात सातत्याने आंदोलने केली. महापालिकेत गेल्या काळात काय झाले आणि काय नाही झाले, हे मुंबईकरांना चांगलेच माहीत आहे. आजही सर्वसामान्य आणि गरीब नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. कुठल्याही प्रकारची मदत मिळत नाहीये. भ्रष्टाचार प्रचंड वाढला आहे.”
“जर सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप केला नसता, तर पुढील पाच वर्षेही अशीच गेली असती. त्यामुळे आम्ही सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानतो. सुप्रीम कोर्टाच्या व्हर्डिक्टमुळेच ही निवडणूक होत आहे,” असेही चेन्निथला म्हणाले.
स्वबळाची स्पष्ट घोषणा
Congress Mumbai Election | काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर करताना चेन्निथला म्हणाले, “आम्ही भाजपविरोधात लढणार आहोत आणि ठाकरेंच्या शिवसेनेविरोधातही लढणार आहोत. खरे देशभक्त आणि धर्मनिरपेक्ष विचारांचे लोक काँग्रेससोबत यावेत. आम्ही महापालिका चांगल्या पद्धतीने चालवू शकतो. लवकरच आमचा जाहीरनामा सादर करू.”
मुंबईकरांना उद्देशून त्यांनी आवाहन केले की, “काँग्रेसला एकदा संधी द्या. आम्ही मुंबई महानगरपालिका सक्षम आणि पारदर्शक पद्धतीने चालवण्याचा प्रयत्न करू.”
भाजपच्या धार्मिक राजकारणावर वर्षा गायकवाडांचा हल्ला
यावेळी काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी भाजपवर जोरदार टीका केली. “निवडणुका आल्या की भाजपचे धार्मिक राजकारण सुरू होते. एकीकडे नवाब मलिक नको म्हणायचे, तर दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचे नेते आशिष शेलार आणि सुनील तटकरे चर्चा करताना दिसतात. नवाब मलिक नको, पण त्यांची मुलगी सना मलिक भाजप सरकारला मतदान करते – हा दुटप्पीपणा मुंबईकरांना स्पष्ट दिसतो,” असे त्या म्हणाल्या.
“सत्तेत राहायचे, फायदे घ्यायचे आणि निवडणूक आली की धार्मिक राजकारण करायचे – मुंबईकर आता यात फसणार नाहीत. मुंबईकर रस्ते, ट्रॅफिक, शुद्ध पाणी आणि स्वच्छ हवा या नागरी प्रश्नांवर मतदान करतील,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
तुम्ही अर्ज केला का ?
Nashik Mahanagarpalika Bharti 2025: तब्बल 114 जागांची मोठी भरती जाहीर! लगेच अर्ज करा